
बनावट उत्पनाचे दाखले काढणारा सराईत गजाआड, जुन्नर पोलिसांची कामगिरी
- क्राईमदेशपुणे
- January 12, 2025
- No Comment
जुन्नर: आपल्या लॉटरीच्या दुकानात संगणकाद्वारे बनावट उत्पनाचे दाखले तयार करून ते नागरिकांना विविध शासकीय कामाकरीता विक्री करीत शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी जुन्नरमधील एक जनाविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे.विनोद चंद्रकांत बिडवई, (राम कृष्ण हरी लॉटरी सेंटर, जुन्नर नगर परिषद व्यापारी संकुल) याला बनावट उत्पनाचे दाखले करून त्याची विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी ज्ञानेश कुलकर्णी यांनी फिर्याद दाखल केली आहे.
ते आपल्या कार्यालयात रेशन कार्ड कागदपत्राची तपासणी करीत असताना एका महिलेचा उत्पनाचा दाखला ४५ हजाराचा होता. तो दाखला कमीचा पाहिजे, असे त्यांनी सदर महिलेला सांगितल्यानंतर काही वेळातच ४२ हजाराचा दाखला घेऊन ती महिला आली. या दाखल्यावर तत्कालीन तहसीलदार जुन्नर यांची डिजिटल सही दिसल्यानंतर हा उत्पन्न दाखला महा ऑनलाइन वेबसाईटवर तपासणी केल्यानंतर तेथे याची कोणतीही माहिती नव्हती. हा दाखला कोठून आणला, अशी विचारणा केली असता राम कृष्ण हरी लॉटरी सेंटरमधून आणल्याचे या महिलेने सांगितले.
यानंतर पुरवठा विभागात काम करणाऱ्या एका इसमाला या लॉटरी सेंटरमध्ये उत्पनाचा दाखला आणण्याकरिता पाठविले असता तेथून १५ मिनिटात त्याचा नावाचा ४३ हजाराचा दाखला त्याला मिळाला. सदरचे दाखले बनावट असल्याचे खात्री झाल्यानंतर तहसीलदार सुनील शेळके यांच्या सूचनेनुसार जुन्नर पोलिसांना ही सर्व माहिती देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक संदीप मोरे , अंमलदार विजय जंगम , पुरवठा विभागातील अधिकारी यांच्या पथकाने या दुकानात जाऊन छापा मारला असता तेथे बिडवई हजर होते. तुझ्याकडे उत्पन्न दाखले तयार करण्याचा परवाना आहे का अशी विचारणा केली असता तसा परवाना नसल्याचे सांगण्यात आले.
या पथकाने याठिकाणी तपासणी केली असता तेथे इतरांचे अनेक बनावट दाखले मिळून आले. याठिकानाहून सिपीयू , मॉनिटर , कलर प्रिंटर ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सुरू आहे. पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मोरे, विजय जंगम पुढील तपास करीत आहेत.