मुख्यमंत्री:पुणे कोंडीमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील
- देश
- September 3, 2022
- No Comment
पुणे: गेल्या काही वर्षांत पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. ती सोडवण्यासाठी उड्डाणपुलांची रखडलेली कामे, मेट्रो विस्ताराच्या कामांना गती, चांगले रस्ते उपलब्ध करून देण्यासोबतच सार्वजनिक बससेवेत सुधारणा करण्यावर शासनाचा भर असेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
“फेम-2′ योजनेअंतर्गत पीएमपीला मिळालेल्या 90 बसचे लोकार्पण केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडेय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमपीचे संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, केंद्रीय सहसचिव अमित मेहता, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, आमदार महेश लांडगे, सुनील कांबळे, राहूल कुल, सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
डॉ. पांडेय म्हणाले, “फेम-2 अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाचा उद्देश हरित ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देत कार्बन उत्सर्जन कमी करणे आहे. यामुळे विकसीत देश म्हणून ओळख होण्यास मदत होणार आहे. प्रदूषण कमी करून नागरिकांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची आहे. पुणे शहराने ई-मोबिलिटीच्या दिशेने सर्वांत पहिले पाऊल उचलले ही गौरवास्पद बाब आहे.’
कामगारांसाठी सातवा वेतन आयोगाचा निर्णय घ्या
या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन लागू करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी बैठक घ्यावी, अशी सूचना केली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाला. त्यानंतर पीएमपी कामगार संघटना तसेच नगरसेवकांकडूनही हा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली जात होती. तसेच शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनीही मुख्यमंत्र्यांकडे यासाठी मागणी केली होती.