नक्की निवडणुका होणार तरी कधी?
- देशपुणे
- September 13, 2022
- No Comment
पिंपरी-चिंचवड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर 2022 पूर्वी पार पडणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकांचा सहा महिन्यांचा कालावधी आज (मंगळवारी) संपुष्टात येत आहे. राज्य शासनाने प्रशासकांचा आणखी कालावधी वाढविला आहे. त्यामुळे आणखी किती महिने प्रशासकीय राजवट राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महापालिकेतील नगरसेवकांचा 13 मार्च 2022 रोजी पाच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन सरकारने महापालिका आयुक्तांचीच प्रशासकपदी नियुक्ती केली होती. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील प्रशासक झाले होते. महापालिका स्थापनेनंतर दुसरे प्रशासक म्हणून त्यांनी काम केले. पाटील यांची 16 ऑगस्ट 2022 रोजी बदली झाली. त्यांच्याजागी शेखर सिंह यांची नियुक्ती झाली. आयुक्त सिंह हेच प्रशासक असून ते तिसरे प्रशासक आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर 2022 पूर्वी पार पडणार नसल्याचे सांगत राज्य शासनाने प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. त्याबाबतचे वृत्त मराठी वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील फेब्रुवारी 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाल 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला. त्यापूर्वीच निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोना महामारी, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण, राज्यातील राजकीय अस्थिरता यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रभाग रचना, आरक्षण अन् मतदार याद्या यातच महापालिका निवडणूक प्रक्रिया रखडली.
निवडणूक वेळेत होऊ शकली नसल्याने महापालिकेवर प्रशासकीय राज आहे. त्यालाही 6 महिने पूर्ण झाले. आता आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे.