पुणे : भोसरीतील सेक्टर नंबर दहामध्ये असलेल्या खंडे वस्तीमधील झोपडपट्टीधारकांचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध आहे. असे असताना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत (एसआरए) एसआरए प्रकल्प राबविण्याचा घाट घातला जात आहे.
त्याला रहिवाशांनी कडाडून विरोध केला असून, यासंदर्भात रहिवाशांनी मंगळवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सर्वेक्षणाचे काम थांबवावे, अशी मागणी केली.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अधिकारी मंगळवारी खंडे वस्तीतील सर्व्हेक्षण करुन घरांवर नंबर टाकत होते. त्याला नागरिकांनी कडाडून विरोध केला. काही रहिवाशांना हाताशी धरून 500 चौरस फुटाचे घर दिले जाणार असल्याचे सांगून अधिकार्यांकडून फसवणूक केली जात आहे, असा आरोप रहिवाशांनी केला.
येथील एकूण 70 ते 80 रहिवाश्यांचा एसआरए प्रकल्पाला विरोध आहे. तसा लेखी पंचनामा 19 जुलै रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे नायब तहसीलदार सूर्यकांत पठाडे यांनी केला आहे. असे असताना सर्व्हेक्षण केले जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची नागरिकांनी भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले आहे. आमचा विरोध असताना प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न अधिकार्यामार्फत केले जात आहे.
मंगळवारी पोलिसांचा फौजफाट घेऊन दबाव टाकला जात होता, त्यामुळे आम्ही दाद मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे, असे नागरिकांनी सांगितले. जिल्हाधिकार्यांना खंडे वस्ती झोपडपट्टी विकास ट्रस्टच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी दयानंद कोटमाळे, अशोक गव्हांदे, रघु आव्हाड, अतुल शिंगाडे, राहुल शिंदे, छाया मोरे, दत्तात्रय ढवळे यांच्यासह अन्य रहिवाशी उपस्थित होते.