बचत गटांमधील महिलांसाठी खुशखबर, मिळणार 400 कोटींचे कर्ज
- पुणे
- September 2, 2022
- No Comment
पुणे: जिल्ह्यात दोन वर्षांत बचतगटांची संख्या सहापटीने वाढली आहे.
त्यामुळे ग्रामीण भागात खासगी सावकारांकडून जादा व्याजदराने कर्ज घेण्याचे प्रमाण कमी करण्यात बचत गटामुळे शक्य झाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात बचत गटांना 400 कोटी रुपये कर्ज देण्यात येणार असून, त्यापैकी गेल्या पाच महिन्यांतच जिल्ह्यातील 3 हजार 285 बचतगटांना 111 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावरून जिल्ह्यात बचत गटांची चळवळ विस्तारत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक बचत गट आहेत. जिल्ह्यात सध्या 22 हजार 256 बटत गटत आहेत. त्यापैकी करोनाच्या संसर्गाच्या काळात 12 हजार बचत गटांची नव्याने स्थापना झाली. करोनाच्या काळात घरांसह गृहिणींना आर्थिक मदत देणाऱ्या बचत गटांची संख्या आश्चर्यकारक वाढली आहे. जिल्ह्यातील 22 हजार 256 पैकी 13 हजार 814 बचत गट हे कर्ज घेण्यास पात्र झाले आहेत. सन 2022 -23 या आर्थिक वर्षामध्ये बचत गटांना सुमारे चारशे कोटी रुपयांचे कर्ज देता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
मागील वर्षापर्यंत जिल्ह्यातील बचत गटांना दोनशे कोटीपर्यंतचे कर्ज देता येत होते. आता कर्जाची रक्कम दुप्पट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागले आहेत. गेल्या एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत पुणे जिल्ह्यातील बॅंकांनी तीन हजार 285 महिला बचत गटांना 111 कोटी 90 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. पुणे जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे जिल्हा परिषदेचे स्वप्न आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक प्रसाद यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने बचत गटांमधील महिला उद्योजकांना शाश्वत व्यवसाय स्थापन करण्यासाठी मदत करीत आहोत. बचत गटांची उत्पादने विकण्यासाठी पुण्यश्री ब्रॅंड अंतर्गत दुकाने सुरू करण्यासाठी आम्ही दोन कोटींची योजना मंजूर केली आहे. त्यासाठी 85 अर्ज प्राप्त झाले आहेत.