पुणे पोलिसांकडून चोरट्यांना आळा, साडेसात हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त
- पुणे
- September 2, 2022
- No Comment
पुणे: गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी साडेसात हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. त्याचबरोबर आता स्पॉटर किट नावाची यंत्रणादेखील पोलिसांकडून वापरण्यात येेते आहे.
प्रामुख्याने पेठेतील गर्दीच्या ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे चोरट्यांचा माग काढणे पोलिसांना अधिक सोपे जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात भुरट्या चोरट्यांना आळा घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान असते. उत्सव काळातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून भाविकांच्या किमती ऐवजावर डल्ला मारला जातो.
सोन्याचे दागिने, मोबाईल व रोकड ठेवलेली पाकिटे, महिलांच्या पर्स चोरट्यांकडून लंपास केल्या जातात. इतर ठिकाणच्या गुन्हेगारी टोळ्या या वेळी चोर्या करण्यासाठी शहरात दाखल होतात. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी मनुष्यबळाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. स्पॉटर किटमध्ये विविध ठिकाणच्या चोरट्यांचा व सराईत गुन्हेगाराचा डेटा जमा केलेला असतो. तो संशयित गुन्हेगार ठराविक अंतराच्या परिघात आल्याबरोबरच संबंधित यंत्रणा त्याचा अलर्ट देते. तसेच, चोरट्यांचादेखील त्यामध्ये माग घेतला जातो. त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांना पकडण्यास मदत होतो.
शनिवार, रविवार सुट्ट्या लागून आल्याने आणि दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त साजरा होत असलेल्या गणेशोत्सवामुळे या दोन दिवशी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त दर्शनासाठी व देखावे पाहण्यासाठी शहरातील मध्यवस्तीत दाखल होण्याची शक्यता आहे. अशा वेळी गर्दीचा चोर्या करण्यासाठी चोरट्यांकडून फायदा घेतला जातो. त्यामुळे पोलिसांनी सुरूवातीपासूनच चोर्या रोखून सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हे शाखा आणि विशेष शाखेच्या पथकांची नेमणूक केली आहे. साध्यावेशात ही पथके गस्त घालत आहेत. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिणी पथके तैनात करण्यात आली आहेत.