अट्टल चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केले गजाआड, आरोपीविरुद्ध 104 घरफोडीचे गुन्हे दाखल
- Uncategorized
- September 2, 2022
- No Comment
पुणे: पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोड्या करणार्या अट्टल चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. त्याच्यावर यापूर्वी तब्बल 104 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
चोर राजा ऊर्फ राजेश राम पपुल (वय 38, रा. सच्चाई माता मंदिराजवळ, कात्रज) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत डेक्कन, सहकारनगर, बंडगार्डन, भारती विद्यापीठ, हडपसर, कोंढवा, वानवडी अश्या विविध भागांतील 12 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात घरफोडी, चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांनी सूचना केलेल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक हद्दीत गस्त घालत असताना शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि पुण्यासह पिंपरी-चिंचवड भागात घरफोडीचे गुन्हे केलेला आरोपी ‘चोर राजा’ हा कात्रज परिसरात आला असल्याची माहिती कर्मचारी गजानन सोनुने यांना मिळाली होती.
युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने वेशांतर करून दोन टीमच्या साह्याने कात्रज भागातून चोर राजा याला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वैशाली भोसले, विशाल मोहिते, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, कर्मचारी संजय जाधव, उज्ज्वल मोकाशी, प्रमोद कोकणे, नागनाथ राख, गजानन सोनुने यांच्या पथकाने केली.