विजेचा शॉक लागून चिमुकल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
- क्राईम
- September 4, 2022
- No Comment
पुणे धायरी : सिंहगडरोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथे विजेचा शॉक लागून एका चौदा वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवार (दि. 2) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथे घडली.
प्रणव रोहिदास निवंगुणे (रा. आझाद मित्रमंडळ, निवृत्तीनगर, चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे पोलिस गुन्हे निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव हा घरातील पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेला असता, येथील लोखंडी जिन्यात विजेचा करंट उतरला. या जिन्याला त्याचा हात लागताच त्याला विजेचा जोरदार शॉक बसला. या शॉकमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्याला आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.
त्याचे वडील रिक्षाचालक आहेत, तर आई गृहिणी आहे. हा मुलगा काशीनाथ खुटवड मेमोरेबल स्कूलमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. पुढील तपास सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दीपक कादमाने करीत आहेत.