पुरवणी परीक्षेत दहावीत ३० तर बारावीत ३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
- देश
- September 4, 2022
- No Comment
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.
बारावीच्या परीक्षेत ३२.२७ टक्के, तर दहावीच्या परीक्षेत ३०.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे.
बारावीत जे विद्यार्थी नापास झाले त्यांच्यासाठी राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा झाली. बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ५४ हजार ५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ५३ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १७ हजार २८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ३२.२७ टक्के इतकी होती. गेल्या वर्षीच्या पुरवणी परीक्षेच्या तुलनेत यंदाचा निकाल ६.४ टक्क्यांनी वाढला आहे.
दहावीसाठी २० हजार ५१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १९ हजार ४२ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ८०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ७ हजार ६४३ विद्यार्थी एटीकेटी सवलतीसह अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.