५५.६० लाखांचा गुटखा जप्त, आळे फाटा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
- क्राईम
- September 5, 2022
- No Comment
आळे फाटा: आळे फाटा पोलिसांनी 55.60 लाख रुपये किंमतीचा गुटखा व ते घेऊन जाणारा 17 लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त केला आहे. असा एकूण 72.80 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर रोजी रात्री पोलीस हवालदार उमेश भगत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की गाडी नंबर के. ए. 32 सी 4787 या ट्रकमध्ये अवैध गुटखा वाहतूक होणार आहे. ही खात्रीशीर माहिती असल्याने ही बातमी पोलीस निरीक्षक पी. ए. शिरसागर यांना दिली. त्यांनी पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस फौजदार चंद्रा डुंबर, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पोलीस शिपाई प्रवीण आढारी यांना हि माहिती दिली. त्यानंतर हे पथक आळेफाटा चौकात जाऊन थांबले असता एक के. ए. 32 सी 4787 नंबर असलेला ट्रक आला. त्या ट्रकला थांबवून त्यातील ड्रायव्हरला विचारले, की आतमध्ये कोणता माल आहे? ड्रायव्हरने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे गाडी आळेफाटा पोलीस ठाण्याच्या आवारात नेण्यात आली. सरफराज फकीर पाशा खतीब (वय 35 वर्षे, राहणार दुबल गुडी, तालुका हुमनाबाद, जिल्हा बिदर, राज्य कर्नाटक) असे त्याचे नाव व पत्ता विचारल्यावर त्याने सांगितले. त्यानंतर त्याच्या ट्रकची तपासणी केली असता त्याच्या पाठीमागील बाजूस पांढऱ्या रंगाचे पोते ठेवलेले दिसले. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित केलेला गुटखा असलेली पोती आढळून आली. त्यामध्ये एकूण 55 लाख 80 हजार रुपये किंमतीचा सुगंधित सुपारीयुक्त गुटखा व 17 लाख रुपये किंमतीचा एक टाटा कंपनीचा ट्रक असे एकूण 72.80 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार उमेश भगत यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात सरकारतर्फे भा.द.वि कलम 328, 272, 273 व अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26(2), 26(4), 30(2)(ए) प्रमाणे फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत असून आरोपीला अटक करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद शिरसागर, पोलीस निरीक्षक, आळेफाटा पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रा डुंबर, पोलीस हवालदार उमेश भगत, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पोलीस नाईक पोपट कोकाटे, पोलीस शिपाई प्रवीण आढारी, पोलीस शिपाई मोहन आनंदगावकर व पोलीस शिपाई विकास सोनवणे यांनी केली आहे.