पिंपरी: चक्क कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या ग्रीन मार्शलला मारहाण
- क्राईम
- September 5, 2022
- No Comment
पिंपरी: कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या ग्रीन मार्शलला दुकानदाराने बेदम मारहाण केली. थेरगाव येथील एका स्वीट होम मध्ये शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी नीलेश गणपत कांबळे (वय 39) यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, हिम्मतलाल भाटी, त्याचा मुलगा राम भाटी व रामचा मित्र (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी असून ते ग्रीन मार्शल पथकात काम करतात. दरम्यान, ते शनिवारी थेरगाव परिसरात उघड्यावर कचरा करणे, प्लास्टिकचा वापर करणार्यांवर कारवाई करीत होते. दरम्यान, ते थेरगाव येथील आरोपीच्या लक्ष्मी स्वीट या दुकानात गेले. त्यांनी ओळखपत्र दाखवून पथकाच्या कामाविषयी माहिती दिली. दरम्यान, त्यांना दुकानाच्या ड्रॉव्हरमध्ये प्लास्टिकच्या बॅग दिसून आल्या. त्यांनी त्या बॅग जप्त करण्यासाठी मागितल्या असता आरोपी हिम्मतलाल याने नकार देत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, पथकातील महिला कर्माचार्यासही धक्काबुक्की केली. फिर्यादी शेजारी असलेल्या दुकानात कारवाईसाठी गेले असता हिम्मतलाल, त्याचा मुलगा राम व त्याचा मित्र मागे आले. त्यांनी तुम्ही आमच्या दुकानात तपासणीसाठी आलात कसे, असे म्हणत फिर्यादी यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, राम याने हातातील वस्तूने फिर्यादीच्या गालावर मारून त्यांना जखमी केले. शासकीय कर्मचार्यास मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकड पोलिस पुढिल तपास करत आहेत.