
फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर मोठी कारवाई
- क्राईमपुणे
- January 5, 2025
- No Comment
पुणे: महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अखेर फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत महापालिकेने पदपथ, तसेच इमारतींच्या साइड आणि फ्रंट मार्जिनमध्ये मोठ्या प्रमाणावर थाटलेल्या दुकानांमधील मालही जप्त करण्यात आला आहे.
या रस्त्यावर चालण्यासही जागा नसल्याने, तसेच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने वाहतूक कोंडी वाढली होती. त्यामुळे नागरिकांकडून सतत तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र, महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. शनिवारी खासदार मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलविली होती. या बैठकीत मोहोळ यांच्यासह सर्वच आमदारांनी शहरातील अतिक्रमणांबाबत थेट नाराजी व्यक्त केली.

त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाकडून आज तातडीने छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते ज्ञानेश्वर महाराज पादूका चौकापर्यंत दुर्तफा कारवाई करण्यात आली. महापालिकेचा बांधकाम विभाग, तसेच अतिक्रमण विभागाकडून संयुक्तपणे ही कारवाई करत अतिक्रमण विभागाने जवळपास दहा ट्रक माल जप्त केला आहे. याशिवाय बांधकाम विभागाने सुमारे ४ हजार चौरसफूट बांधकाम पाडून टाकले आहे.
प्रत्येक वेळी महापालिकेचे पथक कारवाईस गेल्यानंतर या ठिकाणचे व्यावसायिक आसपासच्या इमारती आणि व्यावसायिक मिळकतींच्या पार्किंगमध्ये हा माल लपवितात. मात्र, शनिवारी कारवाई करताना अतिक्रमण विभागाने या पथारी व्यावसायिकांचा पाठलाग करत त्यांनी लपवून ठेवलेला मालही शोधून काढून जप्त केला आहे. यापुढे या रस्त्यावर दररोज फिरते अतिक्रमण पथक ठेवून कारवाईचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





