खुनाच्या प्रयत्नाचे सहा गुन्हे असलेला अल्पवयीन अटक, गुन्हे शाखेच्या युनिट 3 ची उल्लेखनीय कामगिरी
- क्राईम
- September 2, 2022
- No Comment
पुणे: पुण्यातील एका अल्पवयीन मुलावर अवघ्या सतराव्या वर्षी दहाहून अधिक शरीराविरुद्धचे आणि त्यातील सहा गुन्हे खुनाच्या प्रयत्नाचे दाखल असल्याचे भीषण वास्तव गुन्हे शाखेच्या युनिट 3 दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर उघड झाले आहे.
या दोघांसह त्यांच्या दहा जणांच्या टोळीतील सदस्यांनी सत्तूरने वार करीत व पिस्तुलातून गोळ्या झाडून दहशत माजण्याचा प्रयत्न केला होता. दि. 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी दिवशी सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिंगणे खुर्द येथील सार्वजनिक रस्त्यावर दहीहंडीचा कार्यक्रम सुरू असताना शुभम जयराज मोरे (23, रा. नीलयपद सोसायटी, माणिकबाग) हा त्या ठिकाणी असताना त्याचा मित्र शंकर ढेबे व राहुल सोनकांबळे यांच्यासोबत दोन वर्षांपूर्वी भांडणे झाली होती.
त्याच भांडणाचा राग मनात धरून सुमारे दहा जणांच्या टोळक्याने सत्तूरने वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. तसेच, पिस्तुलातून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करून दहशत पसरवली होती. गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस शिपाई राकेश टेकावडे यांना गुन्ह्यातील दोन विधीसंर्षीत (अल्पवयीन आरोपी) हे वडगाव पुलाखाली थांबल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता, तेथे उभ्या असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
सराईतासह दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात
सराईतावर दहाहून अधिक शरीराविरुद्धचे गुन्हे
दोघांचाही सहभाग दहीहंडीतील गुन्ह्यात असल्याची माहिती अंमलदाराला मिळाल्यानंतर पथकाने दोघांनाही वडगाव पुलाखालून ताब्यात घेतले. दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपासासाठी सिंहगड रोड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
त्यांच्या ताब्यातून एक पिस्तूल जप्त करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर 10 शरीराविरूद्धचे 10 पेक्षा अधिक गुन्हे असून, त्यापैकी 6 गुन्हे खुनाच्या प्रयत्नाचे दाखल आहेत.
सदर कारवाई युनिट 3 च्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, अंमलदार संतोष क्षीरसागर, शरद वाकसे, दीपक क्षीरसागर, रामदास गोणते यांच्या पथकाने केली.