चक्क बिबट्याशी दोन हात, बहाद्दूर महिलेचे सर्वत्र कौतुक
- पुणे
- September 6, 2022
- No Comment
मंचर: आदर्शगाव कुरवंडी येथे घराबाहेर बांधलेली गाय सोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. प्रसंगावधान राखून जोरदार प्रतिकार करून बिबट्याचा हल्ला परतवून लावणाऱ्या कलाबाई देविदास मते (वय ४१) ह्या बहाद्दूर महिलेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मते यांच्या डोक्यावर बिबट्याच्या पंज्याचे वार केल्याने त्यांना टाके पडले आहेत. मंचर उपजिल्हा रुग्णालयात मते यांच्यावर उपचार सुरु आहेत.
रविवारी रात्री सात वाजताच्या दरम्यान त्या गाय सोडण्यासाठी गेल्या. बिबट्या तेथे दबा धरून बसलेला होता. बिबट्याने डरकाळी फोडत त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. मते यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. कुटुंबियांनी त्यांना प्राथमिक उपचाराकरिता घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मते ह्या गंभीर जखम झाल्या असून त्यांच्या डोक्याला टाके पडले आहेत. उपचार घेऊन त्यांना घरी आणले. त्यांचे डोके दुखत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुन्हा उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल करण्यात आले आहे. डोक्याला खोल जखम असून सहा टाके पडल्याची माहिती डॉ. श्वेता गोराने व डॉ.सचिन कांबळे यांनी दिली आहे.
सदर माहिती समजल्यानंतर वनपरिक्षेत्रा अधिकारी पी.एस.रौंदळ, वनपाल एस.एल गायकवाड, वनरक्षक एस.बी वाजे, वनरक्षक ए. एस. होले, आर.सी शिंगाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.यावेळी सरपंच मनिषा तोत्रे, जितेंद्र माळुजे, उपसरपंच जितेंद्र तोत्रे, रवींद्र तोत्रे, कैलास तोत्रे, ग्रामपंचायत सदस्य दगडू मते,बंडू मते, रामदास तोत्रे,अंकुश तोत्रे,भगवान चव्हाण, सुनील तोत्रे आधी ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढत्या बिबट्याच्या हल्ल्याबाबत चर्चा केली.पाच दिवसापूर्वी अंकुश तुळशीराम तोत्रे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने झडप टाकली होती. परंतु सुदैवाने कुत्र्याचा बचाव झाला.
“आदर्शगाव कुरवंडी (ता.आंबेगाव) परिसरात बिबट्याचे उपद्रव वाढत आहेत. बिबट्याने अनेक पाळीव कुत्र्यांचा फडशा पडला आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा. अशी मागणी नागरिक करीत आहेत.